Home News & Events वेगवान मुंबईसाठी ६५ हजार कोटी

वेगवान मुंबईसाठी ६५ हजार कोटी

1135
0
nerul belapur kharkopar railway corridor

मुंबई व परिसरातील उपनगरी रेल्वे मार्गांवरील विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ६५ हजार कोटी रु.च्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती रविवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. नेरुळ ते खारकोपर लोकलसेवेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात गोयल यांनी वेगवान मुंबईचे चित्र मांडले. ‘लोकलसेवेच्या आधुनिकीकरणाच्या योजना येत्या चार ते साडेचार वर्षांत पूर्णत्वास येतील’, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.

नेरूळ ते उरण रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नेरुळ ते खारकोपर लोकलसेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खारकोपर येथे पार पडला. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी विस्तारीत मुंबईसाठीच्या विविध रेल्वे योजनांचा प्राधान्यक्रम जाहीर केला. ‘यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नवे प्रकल्प, सध्याच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण व सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवर अधिक सेवा देण्याचा संकल्प केला आहे. या सेवांसाठीच्या सुमारे ६० ते ६५ हजार कोटी रु.च्या योजनांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारही त्यासाठी सक्रिय योगदान देत आहे’, असेही गोयल म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी भविष्यातील दळणवळण साधनांचा विकास आराखडा मांडला.

‘केवळ मुंबई शहरच नव्हे, तर संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रातील एकत्रित दळणवळणाचा विचार करून सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. आधुनिक काळात दळणवळणाची उत्तम साधने उपलब्ध असलेल्या क्षेत्रांतच वसाहती निर्माण होतील. त्यामुळेच मुंबईपेक्षा दीडपट मोठे क्षेत्र असलेल्या नैना क्षेत्राच्या विकासासाठी सर्वप्रथम सार्वजनिक सेवा निर्माण केल्या जातील’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

यावेळी रेल्वेच्या विविध सेवांचे लोकार्पणही झाले. दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवा व खारकोपर-बेलापूर लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच संपूर्ण मुंबई विभागातील रेल्वे स्थानक व परिसरातील पादचारी पूल, लिफ्ट, सरकते जिने, नव्या तिकीट खिडक्यांचे लोकार्पणही झाले.

सिडको बांधणार ४० हजार घरे

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करतानाच, नव्या विकसित रेल्वेस्थानक परिसरात सिडको तब्बल ४० हजार घरांची बांधणी करणार आहे’, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. ‘नवी मुंबईतील दगडखाण परिसरातील मोकळ्या झालेल्या जागांवर १ लाख घरे उभारण्याचा संकल्प सिडकोने सोडला आहे. निवासाची व्यवस्था रेल्वे स्थानकापासून नजीक असेल तर सार्वजिनक दळणवळण सुविधांचा वापर वाढेल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Source: Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + 5 =